परतीच्या पावसाने पुणे-पिंपरी चिंचवड ला झोडपले, घरात, रस्त्यावर साचले पाणी

ग्लोबल न्यूज – पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आज सायंकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात दुपारपासूनच ढग दाटून आले होते, उकाडा वाढला होता. अखेर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास वीज गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ठिक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, तसेच आकुर्डीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरले होते तर, शहरातील ब-याच भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

परतीचा पाऊस अजून तीन दिवस महाराष्ट्रात हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पिंपरी चिंचवड मधील आज झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, सुरवातीच्या काही क्षणात झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. यामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. पिंपरी अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार आकुर्डी व निगडी येथील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी, चिंचवड तसेच इतर काही भागातील वीज अजूनही खंडीत आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, वीजांचा गडगडाट अजूनही सुरू आहे.

 

दरम्यान, भारताच्या काही भागातून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत परतीच्या पाऊस महाराष्ट्रात पडेल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: