ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनेका कोविड- लसीला मान्यता
लंडन : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) प्रभावी लस विकसित करण्याचे काम जगभरात सुरू आहे. त्याच दरम्यान ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) यांच्याद्वारे विकसित केलेल्या कोरोनावरील लसीला (Coronavirus vaccine) मान्यता दिली आहे. असे करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे आणि त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आता ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिल्याने तेथील परिस्थिती नियंत्रणात येण्याची आशा आहे.
ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या कोविड-१९ लसीला मान्यता देण्यासाठी औषध आणि आरोग्य उत्पादने नियामक एजन्सी (एमएचआरए)ची शिफारस सरकारने मान्य केली आहे.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाची लस कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी?
ब्रिटनमध्ये नुकतेच कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. हा नवा स्ट्रेन खूपच अधिक वेगाने संसर्गजन्य होत असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता दिली आहे. पण ही लस नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र, अद्याप हे स्पष्ट होऊ शकलेले नाहीये की, ही लस कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे की नाहीये. तर जगभरात कोविड-१९ विषाणूवर लस विकसित करणाऱ्या औषध कंपन्यांच्या मते ही लस कोरोनाच्या नवीन विषाणूवर प्रभावी ठरेल.
भारतात सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे लस
भारतात ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाची कोरोनावरील लसीची सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध निर्माता कंपनी अॅस्ट्राझेंका आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संयुक्तपणे कोरोना लसीवर काम करत आहेत. या कोरोनावरील लसीचे नाव कोविशिल्ड (Covishield) असे आहे.
कोविशिल्ड लसीला भारतात लवकरच मान्यता मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. सुरुवातीला आपात्कालीन परिस्थितीत लसीला मंजूरी दिली जाण्याची शक्यता आहे. बुधवार (३० डिसेंबर २०२०) या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक होत आहे.