आपलं उगमस्थान; मासिक पाळी येण्यास कशी सुरुवात होते

मासिक पाळी व्यवस्थापन या युनिसेफ आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे.त्याच मार्गदर्शन बऱ्याच ठिकाणी सुरू आहे.त्याच प्रशिक्षणाचा सारांश लेख स्वरुपात मांडत आहे.

*आपलं उगमस्थान*
खरं आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला उगम स्थान आहे.तसंच मानव जातीला देखील आहेच की! आपल्या सर्वांचं उगमस्थान आहे आपल्या आईचा गर्भ! जिथे आपण नऊ महिने सुरक्षित वाढलो.खरं तर आपल्या संस्कृतीत उगम स्थानाला पवित्र स्थान मानतात.आणि म्हणूनच प्रत्येक माऊलीचं गर्भाशय जणू पवित्र ठिकाणचं आहे.मानव जात निर्माण होते ती बाईच्या कुशीतूनच.निसर्गाची किमया,त्याची रचनाच अगाध! म्हणूनच म्हणतात, निसर्गा सारखा किमयागार दुसरा नाही.

आजवर शालेय शिक्षणात शरीराचे अवयव व त्याची कार्ये शिकलो.पण बाईचं गर्भाशय,त्याच कार्य याची माहिती केवळ सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच ! गर्भाशयात बाळं वाढतं.हे साऱ्यांनाच माहिती आहे.पण ते बाळ तिथं वाढण्यासाठी बाईला पाळीच वरदान निसर्गानं तिला दिलं.मासिक पाळी न येणारी मुलगी आई होऊ शकतं नाही.आणि अशा मुलीशी कोणी लग्न करीत नाही.कारण लग्नानंतर वंश हवा असतो.

हे इतकं वास्तव असताना स्त्रीची मासिक पाळी हा विषय जणू गुपीत मानला जातो.पण मानव निर्मिती या मासिक पाळीमुळे होते तर तो विषय सर्व मानव जातीनं शास्त्रशुद्धरित्या समजून घेणंही गरजेचे आहे.आज हा विषय शाळा शाळांत पोहोचला आहे.मुलींमध्ये याविषयी जागृत केल जातं आहे.कारण अज्ञानामुळे स्त्रीयांमध्ये अनेक आजार वाढत आहेत.म्हणूनच ही माहिती समजून घेऊया.
मासिक पाळी म्हणजे काय?

खरं तर दर महिन्याला स्त्रियांच्या योनीमार्गातून जे रक्त जात त्यास मासिक पाळी असं म्हणतात.इतकं बऱ्याच जणींना माहिती आहे.मुलींना मासिक पाळी येण्याचा कालावधी हा सर्वसाधारण 12 ते18 असा आहे.या वयाच्या दरम्यान मेंदूतून फॉलीकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स(FSH) आणि ल्युटिलायझिंग हार्मोन्स(LH) हे रक्तात पाझरायला सुरवात होत असते. FSH यामुळे स्त्रीबीज पक्व व्हायला सुरुवात होते.आणि जेव्हा रक्तात पाझरणाऱ्या LH ची पातळी वाढते तेव्हा मुलीला पहिली पाळी येते.स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाशय अस्तर असतं.दोन अंडाशय असतात.आणि अंडाशय व गर्भाशय यांना जोडणाऱ्या दोन बीजवाहक नलिका असतात.

अंडाशयात स्त्रीबीज हे जन्मत:च असतात.जेव्हा मेंदूतून वरील हार्मोन्स पाझरायला सुरूवात होते तेव्हा गर्भाशय अस्तराची जाडी वाढायला लागते.त्याच वेळी दोन्ही अंडाशयापैकी कोणत्याही एका अंडाशयातून एक पक्व झालेले स्त्रीबीज चौदाव्या दिवशी बीजवाहक नलिकेत येतं.तिथं ते चोवीस तास जीवंत राहतं.त्याचवेळी शरीर संबंधातून पुरुष बीज तिथे गेला तर स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचं मीलन होऊन गर्भ तयार होतो.आणि तोच गर्भ इकडे जाड झालेल्या अस्तरावर रुजत असतो.पण जेव्हा ते स्त्रीबीज बीजवाहक नलिकेत येतं तेव्हा तिथे जेव्हा पुरुष बीज नसतो तेव्हा ते स्त्रीबीज 28व्या दिवशी गर्भाशयावर येऊन आदळतं आणि जाड झालेल्या अस्तराला घेऊन बाहेर पडतं.यालाच मासिक पाळी असं म्हणतात.

जर मेंदूतून हार्मोन्स पाझरले नाहीत तर मुलींना पाळी येत नाही.अशा वेळी मेंदूच्या डॉक्टरांना दाखवलं जातं.बाळाच्या निर्मितीसाठी निसर्गाने अशी रचना केली आहे.जेव्हा गर्भाशयात बाळ वाढणार नसतं तेव्हा ते मृत स्त्रीबीज आणि जाड झालेलं अस्तर शरीरातील टाकाऊ पदार्थ बनतो.म्हणूनच तो शरीराबाहेर टाकला जातो.ज्याप्रमाणे घाम,मूत्र,शौच शरीराबाहेर टाकले जातात तसंच गरज नसते तेव्हा ते अस्तर व मृत स्त्रीबीज मासिक पाळीच्या रुपाने बाहेर टाकला जातो.

इतकं हे शास्त्रीय आहे.साधं सरळ इतर अवयवांची जशी कार्ये आहेत तसंच प्रजोत्पादन आणि मासिक पाळी हे गर्भाशयाच कार्य आहे.परंतू अजूनही आपल्या समाजात मासिक पाळी याविषयी बोललं जातं नाही.आणि त्याविषयी अनेक अंधश्रध्दा आहेत.याची सविस्तर चर्चा पुढील भागात…..

सुधा पाटील सांगली

ग्लोबल न्युज नेटवर्क: