एकेकाळी नारायण राणे आणि हनुमंत परब हे बाळासाहेबांचे कवचकुंडल होते

एकेकाळी नारायण राणे आणि हनुमंत परब हे बाळासाहेबांचे कवचकुंडल होते

नारायण राणे आणि हनुमंत परब… ही एकेकाळची गाजलेली जोडी. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून ही जोडी शिवसेनेत सक्रिय होती. तो १९७० चा काळ शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाचा होता. अत्यंत जहाल शिवसेनेसारख्या पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे आणि परब यांच्यासारखे ‘अरे ला कारे’ करणारे जांबाज शिवसैनिक सोबत घेऊन शिवसेना वाढवायला सुरुवात केली.

दहशत आणि दादागिरीनेच त्याकाळी शिवसेना वाढू लागली. पण ही दहशत सर्वसामान्यांना त्रास देणारी नव्हती तर अन्यायाविरोधात होती. ही दादागिरी नव्हती तर तो एक दरारा होता. १९७६ ला चेंबूरला बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा सुरु असताना बाळासाहेबांची हत्या करण्यासाठी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी आपल्या प्राणांची बाजी लावून नारायण राणे आणि हनुमंत परब यांनी तलवारींचे घाव स्वत:च्या छातीवर झेलत बाळासाहेबांचे संरक्षण केले.

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर दिले. हीच जोडी बाळासाहेबांची सर्वात विश्वासू जोडी समजली जाऊ लागली. त्याकाळात बाळासाहेबांना अलीकडच्या काळात होते तसे पोलीस संरक्षण नव्हते. शिवाय त्या काळात थैमान घातलेल्या गँगस्टर टोळ्यांच्याही हिटलिस्ट वर बाळासाहेब होते. सत्ता नाही, पक्षवाढीचा संघर्ष आणि अंडरवर्ल्ड चा धोका अशा परिस्थितीत निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांच्या बळावर शिवसेनेचा झंझावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचू लागला. बाळासाहेबांचे दौरे वाढू लागले. या दौऱ्यात अनेकवेळा हल्ल्यांचे प्रयत्न झाले. पण राणे आणि परब यांच्यासारख्या शिवसैनिकांनी ते परतवून लावले.

अनेकदा बाळासाहेबांना जीवे मारण्याच्या, हल्ल्यांचा धमक्या येतं. त्यावेळी संभाव्य धोका ओळखून नारायण राणे आपल्या सुसज्ज ताफ्यासहित बाळासाहेबांना प्रत्येक दौऱ्यात संरक्षण पुरवत होते. राणे आणि त्यांचे कार्यकर्ते मातोश्रीभोवती २४ तास कडेकोट पहारा देत असत. काहीवेळा ‘माझा नारायण माझ्या सोबत आहे’ असे सांगून मा. बाळासाहेबांनी तुटपुंजे पोलीस संरक्षणही नाकारले.

एकीकडे बाळासाहेबांचे संरक्षण करत असताना दुसरीकडे शाखाप्रमुख म्हणून नारायण राणे यांनी समाजकारणात आपली छाप पाडली. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू शिलेदार बनले. पुढे नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी सर्व मानाची पदे बाळासाहेबांनी राणे साहेबांना दिली. बाळासाहेब नारायण राणे यांना मानसपुत्र मानू लागले. त्यांचे नाते घनिष्ट होते. २००० सालानंतर शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांना हे कुठेतरी खुपू लागले आणि बाळासाहेबांना त्रास होऊ नये म्हणून राणे साहेबांना नाईलाजास्तव शिवसेना सोडावी लागली.

शिवसेनाप्रमुखांना आपल्या या कवचकुंडलाचा कायम अभिमान होता, या कवचकुंडलाने मावळे बनून, ढाल बनून आपल्यासाठी घाव सहन केले आहेत याची जाणिव बाळासाहेबांना होती. मात्र आयत्या बिळावर नागोबा झालेल्या केवळ अनुकंपेने पद मिळवणार्यांना मावळ्यांची किंमत कधीच कळायची नाही.

  • विकास पवार
ग्लोबल न्युज नेटवर्क: