कार्तिक एकादशीनिमित्त अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार

 

पंढरपूर | कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. आज सकाळी पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दर्शन रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते.

चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहेत. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यातल्या वारकरी प्रतिनिधीचा मान यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे यांना मिळाला. हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

Team Global News Marathi: