महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी दाखल केला अर्ज

 

कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महाविकास आघाडीचा प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेसाठी आपला अर्ज दाखल केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा आकडा आणखी वाढून २७० पर्यंत जाईल असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी, इतर घटक पक्ष किंवा अपक्ष असतील या सर्वांचा निश्चितच मला पाठिंबा असणार आहे, त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मागीलवेळी झालेल्या निवडणूकीविषयी विचारले असता ते म्हणाले, गेली दोन वर्षे सातत्याने आम्ही सत्ताधारी म्हणून लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील नगरपालिका किंवा जिल्हा परिषद येथील सदस्यांचा विश्वास आम्ही संपादित केला आहे. ​आजच्या घडीला महाविकास आघाडीचा आकडा अडीशेच्या खाली नाही.

येत्या दोन दिवसात हा आकडा आणखी वाढून २७० पर्यंत जाईल असा मला विश्वास आहे. कागदावर पाहिले तर आम्ही सर्व महाविकास आघाडी एकत्र आहोत त्यामुळे विजय निश्चितपणे आमचाच होईल, असेही ते म्हणाले. यावेळी उच्च शिक्षण तंत्र मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पी. एन. पाटील हे उपस्थित होते.

Team Global News Marathi: