ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा डाव भाजपा यशस्वी होऊ देणार नाही- चंद्रकांत पाटील

 

मुंबई | ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले असून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना आरक्षण मिळू नये असा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे. तथापि, भारतीय जनता पार्टी याच्या विरोधात संघर्ष करेल आणि हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला.

भाजपा प्रदेश ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. समारोप प्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर आणि ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. मुंबईत झालेल्या या बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. संगमलाल गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमावले तरीही त्या सरकारचे ओबीसी मंत्री सातत्याने खोटं प्रस्थापित करत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठीची प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत लांबवायची म्हणजे त्यावेळी मोठ्या संख्येने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहील, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न दिसतो. तथापि, भाजपा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपा संघर्ष करत राहील. त्यासाठी पक्षातर्फे ओबीसी जागर अभियान राबविण्यात येईल.

Team Global News Marathi: