न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली सरन्यायाधीश म्हणून शपथ

 

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठी माणसाचा ठसा उमटला आहे. न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. धनंजय चंद्रचूड आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश म्हणून काम बघणार आहेत. १० नोव्हेंबर २०२४ रोजी ते या पदावरून निवृत्त होतील. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पूत्र आहेत. वाय व्ही चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे.

देशाचे मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांनीच पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आज राष्ट्रपतीभवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. धनंजय चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी याआधी अयोध्येतील बाबरी मशीद तसेच गोपनियतेचा अधिकार यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम केलेले आहे.

याआधी धनंजय चंद्रचूड यांनी बॉम्बे उच्च न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. तसेच अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केलेले आहे. या निवडीमुळे पुन्हा एकदा मराठी पताका दिल्लीत फडकला असल्याचे विधान अनके तज्ञ् व्यक्तिंनी केले आहे.

Team Global News Marathi: