नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; थेट राष्ट्रवादीवर आरोप

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला धक्का बसलेला पाहायला मिळत असताना, दुसरीकडे आता ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे.तसे पत्र म्हस्के यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

शनिवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी नरेश म्हस्केही सहभागी झाले होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंडाचे हत्यार उपसले आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ ठाणे किंवा जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रातही काम केले. त्यामुळेच त्यांना या आमदारांचा पाठिंबा लाभला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना साथ दिली आहे. तसेच इतर अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेची गळचेपी झालेली आहे, त्यामुळे आघाडीतून बाहेर पडले पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Team Global News Marathi: