कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर बुधवारी वाजले आहे. निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याच दिवशी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महानगर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळणार आहे. तसेच या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर अर्थात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे होमपीच, मागच्या पाच वर्षात दादांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पद भूषविले होते. मात्र यंदा परिस्थिती त्याच्या उलट आहे. दादांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर विराजमान झाले आहे. तर जिल्हयातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ राज्याचे कॅबिनेट मंत्री पदी विराजमान आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीला अटी-तटीचा सामना असणार यात शंका नाही.
त्यात चंद्रकांत पाटील यांच्या सोबत माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची मनाली जात आहे. लोकसभा निवडणुकीला सतेज पाटील यांनी पक्ष विरोधात भूमिका घेऊन शिवसेना उमेदवार प्रा. मंडलिक यांना निवडून आणले होते. त्यामुळे हा पराजय महाडिक यांच्या जास्तच जिव्हारी लागला होता.
त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धनंजय महाडिक सर्वतोपरी शक्ती पणाला लावून कोल्हापूर मानपावर भाजपचा झेंडा फडकवणार की नाही हे येणाऱ्या मार्च आणि एप्रिल महिन्यात मनपा निवडणुकीला दिसून येईल.