आता परदेशी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

आता परदेशी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ – धनंजय मुंडेंचा निर्णय*

उर्वरित २१ लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर

मुंबई (दि. ०६) —- : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घेतला आहे.

परदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही आज सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून जाहीर करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या २७ जून २०१७ च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती, कोविड-१९ च्या महामारीच्या जागतिक प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी भारतात राहूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते व असे विद्यार्थी संस्थेत पूर्णवेळ प्रवेशित नसल्याने शिष्यवृत्ती च्या लाभापासून वंचित होते.

म्हणूनच खास बाब म्हणून, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत किंवा संबंधित विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत भारतात राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून विद्यापीठाची अनुज्ञेय फी मंजूर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ना. मुंडे यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर सद्यस्थितीत जे विद्यार्थी परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यांनाही लाभ देण्याबाबत ना. मुंडेंच्या निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे यांनी एका पत्रकाद्वारे समाज कल्याण आयुक्त यांना निर्देशित केले आहे. निर्णयाचा थेट लाभ मिळणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: