नोटांवरील फोटोच्या मागणीबाबत केजरीवाल आक्रमक ! पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

 

मागच्या काही दिवसांपासून भारतीय नोट आणि त्यावर असलेले फोटो हा देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रथम भारतीय चलनांवर गणेश आणि लक्ष्मी मातेचा फोटो असावा अशी मागणी केली. त्यानंतर अनेकांनी याबाबत आपले मत व्यक्त करायला सुरुवात केली. आता मात्र केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिले आहे.

“मी पंतप्रधानांना पत्र लिहून १३० कोटी भारतीयांच्या वतीने निवेदन देत आहे की भारतीय करंन्सीवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणेश भगवानचा फोटो देखील असावा”. अशा आशयाखाली अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. दोनच दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेतदेखील इच्छा बोलून दाखवली होती.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी देखील केजरीवाल यांच्या मागणीनंतर नोटांवरील फोटोंसाठी विविध पर्याय सुचवले होते. भाजपचे आमदार राम कदम यांनी नोटांवर वीर सावरकर,बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो असावा अशी मागणी केली.

तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटेवर असावा अशी मागणी केली. मात्र केजरीवाल यांनी लिहिलेल्या पत्रावर आता पीएमओकडून काय उत्तर येते याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Team Global News Marathi: