निशाचर कोरोना आणि झोपलेलं सरकार!

निशाचर कोरोना आणि झोपलेलं सरकार!

“कोरोना निशाचर आहे…म्हणजे दिवसा झोपतो; रात्री उठतो. रस्त्यावर फिरतो,” असं महाराष्ट्रात काय सिद्ध झालंय का?

रात्री सगळं लवकर बंद केलं म्हणून तुम्ही दिवसा गर्दी केली तरी कोरोना झोपलेला असतो…तो काही करत नाही, असं काही आहे का?

रात्री साडेदहाच्या सुमारास कोरोनाला जाग यायला लागते…अकरापर्यंत ताजातवाना तरतरीत झालेला असतो…त्यामुळं, अकरानंतर आपण झोपायचं…रात्री अकराच्या आधी असाल तिथून धावतपळत घर गाठायचं…रात्री यष्टीत असाल, तर तडक उतरायचं. मिळेल तिथं झोपायचं. रात्री कॅबमध्ये असाल, तर तरीही तेच करायचं…असं सरकारच्या आदेशानंतर वाटायला लागलंय.

“कोरोनाला साधारण पहाटे साडेपाचनंतर पेंग यायला लागते. म्हणजे पहाटे सहाच्या ठोक्याला त्याला चांगली झोप लागते. निशाचर आहे नं तो..मग तो सहाला झोपला की आपण उठायचं. यष्टीतनं, कॅब-रिक्षातनं अकराच्या ठोक्याला उतरून जिथं झोपला असला, तिथून उठायचं. मग घर गाठायचं…,” असं सरकारचं म्हणणं आहे का…?

आणि पहाटे चारची ड्युटी असेलबिसेल तर विसरायचं का?

एप्रिल-मेमध्ये कडक म्हणजे कडक लॉकडाउन असतानाही तर आपण दिवस-रात्र कोणाला रस्त्यावर येऊच दिलं नाही. त्यानंतर जूनमध्ये विशिष्ट वेळी दुकानं बंद म्हंजे बंद. पार कडक बंद.

“कसंय, गर्दीत कोरोना घुसत नसतंय. एकेकटं गाठायचा विचार असतोय त्याला…,” जणू असंच वातावरण यंत्रणांनी तयार केलेलं.

आपल्या सरकारला कसं ते बरोब्बर कळतंय. रात्री आपण एकेकटं असतोय. त्यामुळं, रात्रीच कोरोना अॅटॅक करतोय म्हणून रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत कर्फ्युचा निर्णय घेतलाय सरकारनं. सूर्याबरोबर कोरोना गुडूप झाला, की आपलं काम सुरू….

हसावं की रडावं कळत नाही; पण साधं गणित अवाढव्य सरकारला कळत नसेल, तर कप्पाळावर हात मारून घ्यायला पर्याय राहात नाही…

वेळेची बंधनं घातली म्हणजे काम झालं, असं सरकारी व्यवस्थेला मेपासून वाटतंय. विशिष्ट वेळेत सगळं करायला भारत म्हणजे युरोप नाही. इथं मुंबई-पुणे जिल्ह्यांची लोकसंख्या स्पेन देशाएवढी आहे. ब्रिटन आणि फ्रान्स मिळून जेवढी लोकसंख्या होते, तेवढी फक्त महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रात साधारण 28 हजार लोकांमागं एक डॉक्टर आहे.

इथं एकेका रिसोर्ससाठी गर्दी होणार; अशावेळी वेळेची बंधनं खरंतर काढून टाकायला हवीयत. ती न काढता उलट लादत नेण्यानं फक्त गर्दीत, साठेबाजीत आणि नफेखोरीत वाढ होते, असा आजपर्यंतचा कोरोना अनुभव आहे. जूनमध्येही सरकारने हाच प्रयोग केला. संध्याकाळ व्हायला लागली, की दुकानं बंद होण्याच्या भीतीनं गर्दीचा पूर लोटायचा.

असं असताना ‘रात्रीचा कर्फ्यु’ वगैरे सुचत कसं असावं?
त्याचे फायदे काय, हे सांगणारा असा कोणता संशोधक सरकारला सापडलाय?

आजारी पडेल, त्याच्यावर उपचाराची भक्कम व्यवस्था उभी करणं हे सरकारचं काम आहे. ते सोडून सरकार नसत्या गोष्टींच्या मागं फार लागलंय.

लॉकडाउननं झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी दुप्पट-तिप्पट काम करणाऱ्या महाराष्ट्राला ‘नाईट कर्फ्यु’मध्ये अडकवणं हा शुद्ध नाकर्तेपणा आहे.

कोरोनावर असा ‘रात्रीचा कर्फ्यु’ नावाचा अक्सीर इलाज सुचविणाऱ्याला हेल्थ, सायन्स आणि फायनान्सचं जागतिक अॅवॉर्ड किंवा थेट नोबेल आपणच का घोषित करू नये?

हा नाईट कर्फ्यु कोरोनाला निशाचर बनवतोय आणि सरकारला झोपवतोय हे नक्की…!!

– सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: