घाबरण्याची गरज नाही, मी राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही – शरद पवार 

मुंबई – वयाच्या ८२ व्या वर्षीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्या कार्यशैलीने महाविकास आघाडीचे अनेक तरुण आमदार प्रभावित झाले आहेत. महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी काल सकाळी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली.

सुमारे 2 तास शरद पवार यांनी या आमदारांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत आमदारांनीही आपल्या मनातील प्रश्न शरद पवार यांच्यासमोर ठेवले. बैठक आटोपल्यानंतर आमदार निघून जात असताना शरद पवार उभे राहिले, दोन्ही हात धरून मुठ घट्ट धरली आणि म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही.

भाजप त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी असेल, पण त्यांच्या अनेक नेत्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, हे मतही शरद पवार यांनी या तरुण आमदारांसमोर व्यक्त केले आहे. विशेषत: 24 तास काम करण्याची तयारी, योजनांचे मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती असे अनेक गुण भाजप नेत्यांकडून शिकायला हवेत. यासोबतच शरद पवार यांनी तरुण आमदारांना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा मंत्रही दिला.

राज्यात अलीकडेच बरेच काही घडत असते. तरुण आमदार त्यावर बरेचदा प्रतिक्रिया देतात. त्याची गरज आहे का, ते तपासून बोलले पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायाचा नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडे असलेले अल्पसंख्यांक विकास खाते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तर कौशल्य विकास खाते सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

त्यांच्याकडील परभणीचे पालकमंत्रीपद सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना, तर गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर दिले जाईल. मलिक हे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणूनही कायम राहतील. पण नरेंद्र राणे आणि नगरसेविका राखी जाधव यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: