राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना शिवसेना पक्षाचा जोरदार धक्का

सध्या राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यातच आता मुक्ताईनगर मधील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे गटाला शिवसेना पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक वेटींगवर असल्याची माहिती मिळाली.

मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यामुळे जळगाव मनपापाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. १७ पैकी भाजपाचे होते १३ नगरसेवक मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे सन २०१८ मध्ये नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाले.

नगरपंचायत रूपांतर झाल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत १७ पैकी १३ नगरसेवक हे भाजपाचे अर्थातच एकनाथ खडसे गटाचे निवडून आले होते. एका अपक्ष उमेदवाराने खडसे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खडसे गटाकडे १४ नगरसेवक झाले होते. शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. हे नगरसेवक हे भाजपाचे असले तरी खडसे समर्थकच होते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते पियुष महाजन, उपगटनेते संतोष कोळी, माजी सभापती मुकेश वानखेडे, बिल्किसबी अमानुल्ला खान, शबाना बी अब्दुल आरिफ , नुसरतबी मेहबूब खान यांचा समावेश आहे.

Team Global News Marathi: