ज्ञानवापीचा मुद्दा म्हणजे महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न

वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही, पण काहीही करून देशात हिंदू-मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे असे भाजपचे धोरण आहे. महागाई, बेरोजगारी यावरून लक्ष हटविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

 

अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदेल असे आम्हाला वाटत होते, पण भाजपचा विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना हवा देऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवारांनी भारतीय जनता पक्षावर केला होता.

‘अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भाजप आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यावर देशासह जगभरातील लोकही अभिमान बाळगतात. ताजमहाल ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की, ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी तो बनवला, असे पवार म्हणाले.

‘दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुबमिनार हिदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळय़ा गोष्टी यासाठी सांगतोय कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी, सांप्रदायिक विचारांना चालना दिली जात आहे,’ असे पवार म्हणाले.

Team Global News Marathi: