नवनीत राणा आणि रवी राणांचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक

 

नागपूर | हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आज अमरावतीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. या वेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निश्चय राणा दाम्पत्याने केला होता.

राणा दाम्पत्यांच्या या स्टंटबाजीमुळे 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला. या घडामोडीनंतर तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले. त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते.

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार घातला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याचा कार्यकर्त्यांच्या वतीनं दुग्धाभिशषेक करण्यात आला. मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमानाकडे प्रार्थना करत आहोत, अशी टीका 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खासदार नवनीत राणा यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणासंदर्भात नाट्यमय घडामोडीनंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

Team Global News Marathi: