नवी मुंबई | ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर सीबीडी पोलिसांची कारवाई

 

ठाणे | ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मॅनेजरसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील सिक्वेन्स बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालत होता. त्याठिकाणी काम करणाऱ्या महिला कामगार अश्लील नृत्य करत ग्राहकांसोबत अश्लील चाळे करत होत्या. याची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यामध्ये गैरप्रकाराची माहिती समोर येताच छापा टाकण्यात आला.

याप्रकरणी मॅनेजर प्रताप शेट्टी याच्यासह महिला व वेटर अशा दहा जणांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रबाळे एमआयडीसीमधील माया डान्सबारवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. त्याठिकाणी २७ बारबाला आढळून आल्या असून, त्यांच्याकडून अश्लील नृत्य करून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात डान्सबार चालत असून, सोयीनुसार त्यावर कारवाई केली जाते. यामुळे आजवर शहरातील डान्सबार पूर्णपणे बंद होऊ शकलेले नाहीत. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसीमध्ये माया डान्सबार चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. याद्वारे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री त्याठिकाणी छापा टाकला. यामध्ये तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला कामगार अश्लील नृत्य करून ग्राहकांसोबत गैरकृत्य करताना आढळल्या. त्यानुसार गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून संबंधितांवर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामध्ये बार मॅनेजर, वेटर व ग्राहकांचा समावेश आहे. तर २७ बारबालांनादेखील ताब्यात घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. यापूर्वी देखील नवी मुंबईत अनेक डान्सबारवर कारवाया केल्या आहेत. मात्र, पकडण्यात आलेल्या महिलांना कारवाईतून वगळून दोन ते तीन महिलांचा उल्लेख केला जातो.

Team Global News Marathi: