नवाब मलिक यांनी ‘दाऊद गँग’बरोबर कट रचून कुर्ल्यातील मालमत्ता हडपली

 

कुर्ला येथील गोवावाला कम्पाउंडची जागा बळकविण्यासाठी ‘डी गँग’ सदस्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार व गुन्हेगारी कट रचण्यात मंत्री नवाब मलिक यांचा थेट व जाणूनबुजून सहभाग होता, हे दर्शविणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे ईडीने मलिक यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेताना विशेष पीएमएलए न्यायालयाने सांगितले.

गेल्या महिन्यात ईडीने मलिक यांच्यावर पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्याचे वाचन केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी म्हटले की, तक्रारीमध्ये आरोपीवर करण्यात आलेले आरोप आणि रेकॉर्डवर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यास पुरेशी कारणे आहेत.

नवाब मलिक आणि त्यांच्या कंपन्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा.लि., मलिक इन्फ्रास्ट्रक्चर, तसेच १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी, सध्या औरंगाबाद कारागृहात असलेला सरदार शाहवली खान ऊर्फ सरदार खान या सर्वांविरोधात न्यायालयाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली. मलिक आणि डी कंपनीच्या सदस्यांनी गुन्हेगारी कट रचला आणि मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेतला.

सरदार खानही या कटाचा एक भाग होता, असे नोंदविण्यात आलेल्या जबाबांबरून दिसते. प्लंबरची मालमत्ता हडप करण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून त्याला गोवावाला कंपाउंडमध्ये सुमारे ३६८ चौरस मीटर क्षेत्रफळ मिळाले. अनेक बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. मलिकांनी पारकर आणि सरदार यांच्या ताब्यातील भाग स्वतःच्या ताब्यात घेतला, असे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: