घोटाळेबाजांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का झाली? – नवाब मलिक

 

मुंबई | दोन दिवसांपूर्वी एबीजी शिपींग कंपनीचा सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा समोर आला आहे. एकंदरीत मोदी सरकारच्या काळात रेकॉर्डब्रेक घोटाळे झाले आहेत. नीरव मोदी यांचा १३ हजार कोटींचा घोटाळा होता. २०१५ साली एबीजी शिपींगच्या घोटाळ्याची तक्रार झाली होती. तरीही इतकी वर्ष सीबीआयने यात गुन्हा दाखल का केला नाही? घोटाळेबाजांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का झाली? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विचारले आहेत.

बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने धीम्यागतीने तपास सुरु केला. मोदी यांच्या कार्यकाळात जवळपास साडेपाच लाख कोटींचे बँक घोटाळे झाले आहेत. तसेच कोणत्याही आरोपींकडून वसुली झालेली नाही. काही आरोपी तर परदेशात लपून बसले आहेत. त्या सर्वांना कोणाचे संरक्षण आहे, असा प्रश्न देशातील जनतेच्या मनात निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

दिवाळखोरी आणि नादारी संहिता , २०१६ आल्यानंतर अनेक कंपन्यांचे संचालक कंपनी बुडवून बँकाचे पैसे बुडवत आहेत. या कायद्याचा आधार घेऊन बँक लुटण्याचा मोठा कारभार या देशात सुरु आहे. विशेषतः भाजपच्या नेत्यांनी बँकाचे कोट्यवधी रुपये बुडवले आणि नंतर इन्सॉलवन्सी फाईल करत आहेत, असे मलिक म्हणाले.

सीबीआयचे छापे त्यांच्यावर पडले असूनही ईडी त्यावर शांत आहे. बँक बुडवण्याच्या कामात भाजपचे नेते, त्यांचे समर्थक सहभागी आहेत. त्यांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, त्याशिवाय साडेपाच लाख कोटींचा घोटाळा होऊ शकत नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

Team Global News Marathi: