‘नथुरामच्या चिल्ल्या पिल्ल्यांना काय वाटतं. जितेंद्र आव्हाड यांनी साधला भाजपवर निशाणा

 

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीकरून सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. या बंदवरुन भाजपा नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर शरद पवारांच्या जालियनवाला बाग टीकेला उत्तर देताना मावळच्या गोळीबाराची आठवण करुन दिली होती. दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंदवरुन होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘भाजपा काही करणार नाही. मिश्रांना ते मंत्रिमंडळातून काढणार नाहीत, कारण त्यांचे संस्कार आणि संस्कृती तशी आहे. बापाला लाज वाटली पाहिजे माझा मुलगा असा वागूच कसा शकतो. अंगावर शहारा आणणारं ते दृश्य होतं. समोर माणूस दिसत असताना अंगावर गाडी घातली. एकाने तर रिव्हॉल्ववरने गोळी घातली खाली पडलेल्या व्यक्तीला.हे त्यात दाखवण्यात आलं नाही,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी अमेरिकेच्या जॉर्ज फ्लाइडचं उदाहरणदेखील दिलं. या घटनेची तुलना त्याच्याशी करता येईल, कारण यामध्ये सत्तेचा माज दिसतो असं ते म्हणाले आहेत. बंदसाठी बळजबरी झाली का हा चौकशीचा विषय आहे, पण बंद झाला हे मात्र खरं आहे. फाशी द्या काहीही करा पण प्रश्न माणुसकीचा आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. ‘दुखवटयाचा एक शब्दही भारतीय जनता पक्षाकडून आला नाही याचा अर्थ आम्ही करु तो कायदा, आम्हाला सत्तेचा माज आला आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे,’ अशी टीका यावेळी त्यांनी केली.

‘लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली असून मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलीस आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काही फरक आहे की नाही? अजय मिश्रांना काय कुठेही घुसा आणि चिरडून टाका याचा परवाना दिला आहे का? चार दिवसांनी अटक करता.हा कसला सत्तेचा माज. कायदा, घटना या देशात काही आहे की नाही? गरीब मेले तर काही नाही, श्रीमंत मेले तरच वाईट वाटणार का?,’ असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

Team Global News Marathi: