माथेरानच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी

 

माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. या आगोदर देखील उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. काल आलेल्या कॉलमध्ये मागच्यावेळी सोडलं, यावेळी कर्जतमध्ये आल्यास जीवे मारु अशी धमकी अज्ञाताने फोन करुन दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेत्या नेत्याने थेट पोलिस स्टेशन गाठलं आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट फुटल्यापासून शिवसेनेचे दोन ग्रुप तयार झाले आहेत. त्यातून हा प्रकार तयार झाला आहे.

शिवसेनेत उठाव झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिले होते. तसच कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसाद सावंत हे कर्जतला गेलेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता. यातून केवळ दैव बलवत्तर म्हणून सावंत वाचले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून हल्ल्यातील जवळपास 8 ते 10 आरोपी हे अजूनही फरार आहेत.

दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले प्रसाद सावंत हे सध्या माथेरानमधील घरी बेडरेस्टवर आहेत. रविवारी 31 जुलै रोजी त्यांना एका नंबरवरून फोन आला. हिंदीत बोलत असलेल्या फोन करणाऱ्या इसमाने सावंत यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतागिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला, तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं. पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी फोन करणाऱ्या इसमाने दिली. याप्रकरणी सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांच्यावरील हल्ल्यातले बहुतांशी आरोपी अद्याप मोकाट फिरत असून त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.

Team Global News Marathi: