नाशिक : पारा ४.४ अंशांवर गेल्याने पुन्हा हुडहुडी वाढली

पारा ४.४ अंशांवर गेल्याने पुन्हा हुडहुडी वाढली

नाशिक : जिल्ह्यात यंदा सर्वात नीचांकी तापमानाची नोंद निफाड गहू संशोधन केंद्र येथे ४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. एकीकडे कमी झालेले तापमान पुन्हा वाढत असताना पुन्हा एकदा तापमानाची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थंडीने हुडहुडी भरली आहे.

निफाड तालुका व परिसरात थंडीचा कडाका कायम असल्याने काही भागांत द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या वाढली होती. तर काढणी योग्य तयार होत असलेल्या द्राक्ष मालात साखर उतरण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर तापमानात किंचित वाढ झाल्याने नुकसान टळण्याची भीती कमी होत होती. त्यातच पुन्हा तापमान कमी झाल्याने चिंता वाढली आहे.

निफाड तालुक्यात या महिन्यात मोठ्या प्रमाणावर थंडीचा जोर वाढण्यासह मुक्कामही वाढला आहे. एकीकडे द्राक्ष पिकांसाठी ही थंडी बाधक असली, तरी गहू, हरभरा पिकांना थंडी पोषक असल्याने पिके जोमात आहेत.

मात्र धुके व दव पडत असल्याने कांदा पिकावर करपाजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर दुभत्या जनावरांवर थंडीचा परिणाम होत असून दुधावर त्याचा परिणाम होत आहे. प्रमुख्याने पिकांसह मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामध्ये सर्दी, पडसे, ताप, डोकेदुखी, अंगदुखी व हाडांचे दुखणे यांचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: