नारायण राणेंच्या नावाने कणकवली का ओळखली जात नाही?

 

बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, प्रा. गोपाळ दुखंडे यांच्या नावाने कोकण ओळखले जाते, मग नारायण राणे यांच्या नावाने का ओळखले जात नाही? का त्यांच्या नावाने कणकवली ओळखली जात नाही? याचा जनतेने विचार करण्याची गरज आहे. धर्म, जातीच्या आधारावर भाजप तुमच्यात फूट पाडत आहेत, त्याचा प्रतिकार करा. राजकारण हे सत्ताभिमुख न होता, लोकाभिमुख झाले पाहिजे. यासाठी संविधान वाचविण्यासाठी त्यातील तरतुदीनुसार आपल्याला वागावे लागेल. त्यामुळे आता संघर्ष करायला तयार व्हा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केले.

शिवसेनेच्या वतीने आयोजित महाप्रबोधन यात्रेचे सोमवारी सिंधुदुर्गात आगमन झाले. त्याअंतर्गत कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, २०१४ मध्ये भाजप निवडणुकीला सामोरे गेला, तेव्हा महागाई कमी करणार असे त्यांनी सांगितले होते. आता डाळ, आट्याचे भाव वाढले आहेत; पण त्यांना ते काय कळणार? आता २०० टक्क्यांनी महागाई वाढली आहे. देशाचा जीडीपी कोसळला आहे. पावणेदोन टक्क्यांपर्यंत तो मोदी सरकारने आणून ठेवला आहे. कुपोषित देशांच्या यादीत आपला देश आला आहे.

आपल्या देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे. चीन, जपान या देशांची प्रगती झाली. भारत हा तरुणांचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? राज ठाकरे यांनी एखाद्या नेत्याची नक्कल केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, आमच्यावर होत आहेत. आम्ही सरकारला प्रश्न विचारतो, त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाखाली गृहविभाग काम करीत आहे. तुम्ही सरकारला प्रश्न विचारत असाल तर तुम्ही धर्म संकटात टाकत आहात, असे भाजपचे म्हणणे आहे.

भाजपकडून भ्रमाचा भोपळा बनवून काम केले जाते आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनतेचे प्रबोधन केले जात आहे. त्यासाठीच ही महाप्रबोधन यात्रा आहे. सावरकर यांच्याबद्दल नारायण राणे यांच्या मुलाने ट्वीट केले होते. ते आम्ही लोकांना दाखवले तर पोलिस विभाग आम्हाला कारवाई करण्याची नोटीस पाठवत आहे, असेही प्रा. अंधारे म्हणाल्या.

Team Global News Marathi: