नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार

 

पुणे | देशाचे प्रधानमंत्री ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. प्रोटोकॉल नुसार देशाचे प्रधानमंत्री ज्या राज्यात दौऱ्याला जातात, त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित राहतात. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार नाहीत. राज्य सरकारच्या वतीने अजित पवार आणि सुभाष देसाई हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना लांबचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या अधिवेशनातही उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. दरम्यान महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये.

कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा

सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकाचे उद्घाटन व पाहणी करतील आणि तेथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोचा प्रवास करतील.

Team Global News Marathi: