नारायण राणे यांचे विधान हस्यास्पद आणि चिंटूचे जोक्स आहेत

 

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल भेट झाली आहे. हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. तसेच, नीलम गोऱ्हे मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चाही होती. त्यानंतर त्यांची शिंदेंसोबत झालेल्या भेटीमुळे आणखीन नव्या चर्चेला उधान आले आहे.

अशातच नीलम गोऱ्हे शिवसेनेत नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या याच वक्तव्याला नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नारायण राणे यांचे विधान हस्यास्पद आहे. ते चिंटूचे जोक्स आहेत. माझे त्यांच्याशी कधी बोलणेही झाले नाही. तसेच, २००४ नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी शिंदे गटात जाणार नाही. मला तशी गरजच वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नीलम गोऱ्हे ट्रायडंट हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटल्या. या दोन्ही नेत्यांबरोबर नीलम गोऱ्हे यांनी तासभर बंद दाराआड चर्चा केली. शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते. अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. असे काही नाही. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन नीलम गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांना दिले.

श्रद्धा ही महाराष्ट्रातील वसईची राहणारी होती. तिची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी शिंदे यांच्याकडे केली. याबाबत कार्यवाही करीत असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

 

Team Global News Marathi: