कणकवली : नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात . त्यामधील नारायण राणे हे एक आहेत, असे वक्तव्य विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते व खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना केले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होतं. ६५० हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे,आरोग्य व्यवस्थेचा विचार करणे गरजेच आहे . नारायण राणे यांना मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. महाराष्ट्रात मेट्रो आणि समृद्धीच्या प्रकल्पांना जसा विरोध होतोय त्याप्रमाणे त्यांना विरोध झाला असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे : चंद्रकांतदादा पाटील
यावेळी भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे हा सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा नेता आहे. नारायण राणे यांनी अमित शाह यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावून एक स्वप्न साकार केले. आता त्यांनी कोकणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमित शाह यांना विनंती करावी, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले. कोकणातील अनेकजण नोकऱ्यांसाठी मुंबईत जातात. हे लोक मुंबईतील झोपडपट्टीत आनंदाने राहत नाहीत. मात्र, त्यांना नाईलाजाने पोटापाण्यासाठी तेथे राहावे लागते. त्यामुळे नारायण राणे यांनी कोकणात रोजगारनिर्मितीसाठी अमित शाह यांना साकडे घालावे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमित शाह गोवा येथून हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. दरम्यान या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, नेते विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.’