नागपूर अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी कायदा विधेयक आणण्याच्या शिंदे सरकारच्या हालचाली

 

महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.त्यासाठी इतर राज्यांमधील अशा कायद्यांचा अभ्यास सुरू आहे. गृह विभाग आणि विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी चर्चा आणि अभ्यास करीत आहेत. श्रद्धा वालकर हत्येनंतर लव्ह जिहादचा विषय पुन्हा ऐरणीवर आहे. विधेयकाचा मसुदा निश्चित करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासह काही आमदारांना जबाबदारी देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशातील कायद्यांचा अभ्यास केला जात आहे. लव्ह जिहादविरुद्ध कायदा महाराष्ट्रात झालाच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माध्यमांना सांगितले. उत्तर प्रदेशच्या कायद्यातील तरतुदींनुसार लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करणे, धर्म लपवून केलेला विवाह किंवा अशा विवाहाला सहाय्य हा गुन्हा आहे. आरोप सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड होवू शकतो.

यावे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लव्ह जिहादच्या कायद्यासंदर्भात पडताळणी करतो आहे. कायदा आणण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले आहेत याचा अभ्यास सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

Team Global News Marathi: