उस्मानाबाद जनता बँक निवडणुकीत नागदे-मोदाणी-शिंदे पॅनलची सत्ता कायम

उस्मानाबाद:  मराठवाड्यासह राज्यात व राज्याबाहेर सहकारी बँकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या 14 सदस्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नागदे मोदाणी-शिंदे पुरस्कृत जनता बँक विकास पॅनलने सत्ता कायम राखली. प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत सभासद व कर्मचारी परिवर्तन पॅनलचा पंधरा हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. मागील 20 वर्षांपासून बिनविरोध निवडीची परंपरा लाभलेल्या बँकेची निवडणुकीची औपचारिकता पार पडूनही भाजपने दिलेले आव्हान सभासद मतदारांनी फेल ठरवले.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक सत्ता कायम राखण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष ब्रिजलाल मोजणी, वसंतराव नागदे, जेष्ठ संचालक विश्वास शिंदे पुरस्कृत जनता विकास पॅनल उभे केले होते तर सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सभासद व कर्मचारी परिवर्तन पॅनल उभे केले होते. 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुधीर पाटील यांच्याकडे तेरा उमेदवार होते.

शुक्रवारी उस्मानाबाद,सोलापूर, लातूर,बीड आणि बिदर जिल्ह्यातील 154 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान प्रक्रियेत एकूण 67 हजार 821 सभासद मतदारांपैकी 48.02 % म्हणजे 32 हजार 576 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. शनिवारी छायादीप लॉन्स येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एकुण पन्नास टेबलावर हि मतमोजणीची प्रक्रिया चालली. पहिल्या फेरीअखेर नागदे-मोदाणी-शिंदे पुरस्कृत पॅनल आठ हजाराच्या मताधिक्क्याने पुढे होते. दुसऱ्या फेरीअखेर पंधरा हजाराच्या मताधिक्य फरकाने सुधीर पाटील यांच्या पॅनेलचा पराभव केला.

विजयी जनता बँक विकास पॅनलमध्ये वसंत संभाजीराव नागदे,विश्वास जगदेवराव शिंदे, आशिष ब्रिजलाल मोदाणी,तानाजी नानासाहेब चव्हाण,सुभाष वसंतराव गोविंदपूरकर, प्रदीप कालिदासराव जाधव-पाटील, वैजनाथ ग्यानदेव शिंदे, निवृत्ती मारुती भोसले,सुभाष बाबुराव धनुरे, नंदकुमार लिंबाजी नागदे, राजीव मनोहर पाटील, हरी रामजीवन सूर्यवंशी, करुणा संजय पाटील, पंकजा गोपाळ पाटील यांचा समावेश आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: