मुंबई महानगर पालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता;

 

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत असून येणाऱ्या वर्षाच्या सुरवातीला मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळी लोकसंख्येच्या आधारावर मुंबईत नऊ प्रभाग वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

त्यानुसार आगामी पालिका निवडणुकीसाठी २३६ प्रभागांच्या फेररचनेचा आराखडा तयार केला जात आहे. मात्र पंधरवडा उलटत आला तरी अद्याप याबाबतची अधिसूचना नगरविकास खात्याने महापालिकेला पाठविलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे नऊ प्रभाग वाढविण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ एवढी होणार आहे. पालिकेने यापूर्वी २२७ प्रभागांच्या रचनेचा मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. मात्र आता नऊ प्रभाग वाढविण्यात आल्यानंतर सर्व प्रभागांचे पुन्हा सीमांकन करून सुधारित मसुदा तयार करावा लागणार आहे.

लोकसंख्येच्या आधारे फेररचना केल्यानंतर पूर्व उपनगरांत चार, तर पश्चिम पाच प्रभाग वाढण्याची शक्यता आहे. परंतु याबाबतचा अध्यादेशच प्राप्त न झाल्याने या निवडणुकीच्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: