मुंबई कोणाच्या बापाची नाही; आम्ही खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंना छावा संघटनेचा पाठिंबा

 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी आज मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे राज्यात हालचालींना वेग आला आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायल मिळत आहे. राज्यभरात मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात असलेल्या बंडखोर आमदारांच्या विभागात शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थनातील आमदारांच्या पाठीशी छावा संघटना ठामपणे उभी असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे. त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेनचे नेते संजय राऊत यांच्यासारखे लोक काहीही बोलतात. आई-बहिणींचा आदर ज्यांना ठेवता येत नाही, त्यांना आम्ही ठोकून काढू. आमचा विरोध शिवसेना, राष्ट्रवादी किंवा कोणत्याही पक्षाला नाही. पण ज्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. त्यांनी उठसूट काहीही विधाने केलेले आम्ही खपवून घेणार नाही, असं नानासाहेब जावळे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड नसून सर्वसामान्यांसाठी राजकीय क्रांती करण्यास एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे हजोरा कार्यकर्ते विमानतळावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे. महाराष्ट्रात राहणरा प्रत्येक मराठा आहे. जनतेचे प्रश्न सोडून बाकीची बडबड करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. केवळ आपला मुलगा, पत्नी, कुटुंब याची काळजी या सरकारने अडीच वर्ष घेतली. बाकी जनतेचे प्रश्न बाजूला राहिले. हे आम्ही बघितले आहे. त्यामुळेच सत्याच्या बाजूने आमची संघटना उभी राहिली आहे. मुंबई कोणाच्या बापाची नाही. त्यामुळे इथे येण्यास कोणी कोणाला अडवू शकत नाही, असा इशारा देखील नानासाहेब जावळे यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: