मुंबई अतिवृष्टी: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाचा परिसरही तुंबलेला पाहिला- शरद पवार

मुंबई अतिवृष्टी: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाचा परिसरही तुंबलेला पाहिला- शरद पवार

मुंबईत पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन या सखल भागात पाणी साचते. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कधीही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड यासारख्या दक्षिण मुंबईतील परिसरातही पाणी साचले.

आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाच्या या परिसरात पाणी तुंबल्याचं पाहत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

पावसाची परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंबईकरांनो काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत सुप्रिया सुळे यांनी मंत्रालय परिसरातील पाणी पाहिल्यानंतर “विश्वासच बसत नाही, इतक्या वर्षात इथे कधी पाणी तुंबलेले पाहिले नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शरद पवार यांनीही “मी पहिल्यांदा आयुष्यात इथे या भागात पाणी तुंबलेलं पाहतो आहे,” असं म्हटलं. त्यामुळे मुंबईत अवघ्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर कोलमडलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक बुधवारी (5 ऑगस्ट) पार पडली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होती. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: