मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या डोळ्यावर मुंबई-बारामतीची झापड – प्रकाश आंबेडकर

अकोला : कोरोना ससंदर्भात राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सध्या आघाडी सरकार पुर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामती पुरतीच असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे. यामुळेच उच्च न्यायालयावरच सर्व आदेश देण्याची वेळ आली, असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. कोरोना संकटामुळे देशात आणि राज्यात उडालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टिका केली. महाराष्ट्रात यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीची कोणतीच बैठक अद्यापपर्यंत झाली नसल्याचे आंबेडकर म्हणालेत. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट होणंही दुरापास्त झालं आहे. या परिस्थितीत किमान यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं या समितीतील सदस्यांची नावं सरकारनं जाहीर करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्र आणि राज्यातील सरकारनं तयारीच केलेली नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. दुसऱ्या लाटेत उभी केलेली व्यवस्था मोडीत काढल्याने दोन्ही सरकारांवर त्यांनी हलगर्जीपणाचा आरोप केला. यामुळे दोन्ही सरकारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असंही आंबेडकर म्हणालेत. तिसऱ्या लाटेत लहान बालकं बाधित होण्याची मोठी शक्यता आहे. मात्र, राज्य सरकारने यासंदर्भात कोणतीच पावलं उचललेली दिसत नसल्याचं आंबेडकर म्हणालेत.

Team Global News Marathi: