मुंबईवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा, संजय राऊत यांचा शिवसैनिकांना कानमंत्र

 

येणाऱ्या काही महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी तसेच विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. ते रविवारी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा विक्रोळीत आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येत मुंबईवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज येथे केले. शिवसेना उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत यांच्या वतीने विक्रोळी मतदारसंघातील सूर्यानगर-शाखा क्र. 120, पवई-शाखा क्र. 122 येथील प्रचंड शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते,

यावेळी राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना अजब रसायन आहे. शिवसेनेची रचना देशातील बऱयाच पक्षांना आकर्षित करीत असते. शिवसेना तिच्या वेगळेपणामुळेच टिकून असून ती आणखीनच बहरत जाणार आहे. आपापसातील वाद आणि मतभेद निवडणुका होईपर्यंत विसरून जा आणि नव्या जोमाने कामाला लागा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. स्थानिक शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी यावेळी आभार व्यक्त करताना या मेळाव्यातील जोश महानगरपालिकेवर भगवा फडकवत नाही तोपर्यंत टिकवून ठेवा असे सांगत उपस्थित पदाधिकाऱयांचे आभार मानले.

Team Global News Marathi: