मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे- खासदार राजन विचारे

 

सोमवारी रात्री ९.१५ वाजता किसन नगर ३, शंकर नगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी खासदार राजन विचारे व जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख दीपक साळवी, हेमंत नार्वेकर व इतर शिवसेना पदाधिकारी गेले होते.शंकर नगर येथील साईज्योत अपार्टमेंट येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर गणेश चौक भटवाडी येथे अशोक देशमुख यांची शांती निवास सोसायटी व शेवटीकडी येथील महाशक्ती अपार्टमेंट मधील सुरज अहिरे यांना भेटून सर्वजण निघाले.

साईराज बिल्डिंग किसन नगर नं. ३ दिशेने निघाले असताना ओमकार सदन आणि योगेश्वर धाम या इमारतीतील समोरच्या मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या गल्लीतून जात असताना, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे माजी नगरसेवक योगेश जानकर १०० ते १५० कार्यकर्त्यांसोबत तेथे आले. योगेश जानकर यांनी उपशहर प्रमुख दीपक साळवी यांना “मला काय बघतोस” असे विचारल्यानंतर त्यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात मारहाण झाल्याचा प्रकार ठाण्यात घडला. याबाबत ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी प्रतिक्रिया दिली.

खासदार राजन विचारे म्हणाले, “आम्ही कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्या पद्धतीने खोट्या तक्रारी, खोटे गुन्हे दाखल करून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. माझ्या ४० वर्षाच्या राजकारणात अशी गुंडशाही मी कधी पाहिली नाही. या मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात आम्ही आमच्या पक्ष वाढीसाठी फिरू नये हा एक प्रकारे लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही यांना जुमानत नाही. या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गुंडाराज सध्या सुरू आहे.

Team Global News Marathi: