मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

 

ज्येष्ठ निरुपणकार, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या गेलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यानं अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच आता संभाजी ब्रिगेडनेही कारवाईची मागणी केली आहे.

“डॉ. आप्पा धर्माधिकारी या व्यक्तीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात अंदाजे 11 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याची बातमी पाहिली. बरेचजण अत्यावस्थ आहेत. कार्यक्रम आयोजनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. तर अजित पवारांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या आयोजकांवर सडकून टीका केली आहे.

मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतरही असं घडायला नको होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कार्यक्रमाच्या तयारीचा दोन-तीन वेळा आढावा घेतला होता. सरकारी कार्यक्रम होता. त्यासाठी जवळपास १४ कोटी रुपये खर्च केले. आजपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्काराला इतकी मोठी रक्कम खर्च केली गेली नाही. पण इतका खर्च केल्यानंतरही असा प्रकार घडायला नको होता. बस, गाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या. कार्यक्रमाच्या वेळेवरूनही अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले.

Team Global News Marathi: