खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरातून मूक आंदोलन

कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजी राजेंनी आज कोल्हापुरातून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकस्थळी आज होणारे मूक आंदोलन हे राज्याला दिशा देणारे असेल. मूक आंदोलन कसे असू शकते, याचा कोल्हापुरातून आदर्श देऊ, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी जाहीर केल्यानुसार सिद्धार्थनगर नर्सरीबाग परिसरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक येथे १६ जूनला सकाळी १० ते १ या वेळेत ‘मूक आंदोलन’ होणार आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, समाज बोलला आहे. समन्वयक बोलले आहेत. आता निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी येथे येऊन मनमोकळेपणाने बोलायचे आहे. यातून मार्ग कसा काढायचा हे त्यांनी सांगायचे आहे.

पाच-सहा मागण्यांचा आरक्षणाशी, सर्वोच्च, उच्च न्यायालयाशीही संबंध नाही. त्या शासनाच्या हातात आहेत. त्या मान्य केल्यास 36 जिह्यांत आंदोलनाची गरज नसल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजी राजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत असे दोन्ही खासदारांनी सांगितले होते. तसेच यावर उदयनराजे यांनी आघाडी सरकारवर टीका सुद्धा केली होती.

Team Global News Marathi: