मोठी बातमी |खासदार धैर्यशील मानेंच्या आईवर फसवणुकीचा गुन्हा

 

कोल्हापूर | हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांनी एकाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरण २०१९ सालचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मागच्या तीन वर्षांपूर्वीच्या फसवणूक प्रकरणात माजी खासदार निवेदिता माने पुन्हा संकटात सापडल्या आहेत.

माजी खासदार माने यांनी 1 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदाराने माजी खासदार यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. फिर्यादीने टेभुर्णी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत उपोषण केले. त्यामुळे निवेदिता माने यांच्यावर कारवाई होणार का याबाबत चर्चा सुरू आहे.

फिर्यादी बबन केचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार निवेदिता माने व इतरांनी संगनमत करुन 2009 मध्ये उजनी जलाशयातील गाळ व रेती उचलण्याच्या ठेक्याची स्थगिती उठवली होती. त्यावेळी तो ठेका पुढील 15 वर्ष राहावा म्हणून 1 कोटी 55 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे केचे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान याबाबत केचे यांनी माजी खासदार माने यांच्याकडे अनेकदा पैसे मागितले.

त्यासाठी ते कोल्हापूरलाही गेले. मात्र त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले गेले नाही. आपल्या मागणीकडे निवेदिता माने यांनी वेळोवेळी दुर्लक्षच केले, असा दावा बबन केचे यांनी केला आहे. माने यांनी फसवणुक केलेली रक्कम व्याजासकट द्यावी, यासाठी मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मात्र यावर अद्याप निवेदिता माने यांनी भाष्य केले नाहीये.

Team Global News Marathi: