मोठी बातमी | खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना जामीन

 

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सईद खान यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. याच प्रकरणात भावना गवळी या ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. हायकोर्टाने एक जुलै रोजी खान यांना जामीन मंजूर केला.

ईडीने सईद खान यांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पीएमएलए कायद्यानुसार अटक केली होती. ईडी विशेष न्यायालयाने खान यांचा याआधी जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. ईडीने मे 2020 मध्ये फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल केला होता.

शिवसेना खासदार भावना गवळी या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी या संस्थेत 19 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. सईद खान यांची पावणेचार कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ईडीने सईद खान यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यांसह आणि अटींसह जामीन मंजूर केला आहे.

भावना गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे सईद खान हे देखील संचालक आहेत. प्रतिष्ठानमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी प्रतिष्ठानला कंपनीत बदलण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा दावा ईडीनं केला. याच पैशांतून जप्त केलेली मालमत्ता विकत घेण्यात आल्याचा दावाही ईडीनं केला आहे.

भावना गवळी यांच्या वडिलांचे सोबती असलेले शिवसैनिक हरीश सारडाने यांनी भावना गवळींची ईडीला तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरलं होते.सोमय्यांनी वाशीमला येऊन पत्रकार परिषद घेतली होती. भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपने केला होता.

Team Global News Marathi: