मोठी बातमी | आम्हीच शिवसेना असल्याचं शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

 

नवी दिल्ली | शिवसेनेत अभूतपूर्व बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक चाली रचल्या जात आहेत.लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे.

विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पाडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सरकारदेखील स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सामिल झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत: ची नवीन कार्यकारणी घोषित केली. त्यानंतर शिंदे गट आता शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला रात्री उशिरा एक पत्र दिले. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पहाटेपासून दिल्लीत आहेत. त्यानंतर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी नेमण्याची मागणी केली होती. त्यासाठी पत्रदेखील दिले गेले. रात्री उशिरा राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रात्रीच उशिरा निवडणूक आयोगाला पत्र सोपवण्यात आले.

Team Global News Marathi: