मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे ‘ब्लॅकमेलिंग’; थेट गूगलने घेतली दखल

 

कोरोना संसर्ग काळात मोबाईल ॲपद्वारे सुलभ कर्जाचे आमिष दाखवून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. लोन ॲप्सचे जाळे अनेक ठिकाणी पसरले आणि अनेकांचे संसार देखील रस्त्यावर आलेत. अशी कर्ज फेडताना होणाऱ्या छळाला कंटाळून मुंबईतील संदीपनं आत्महत्या केलीय. संदीपला ‘तू कर्ज घेतलंय आणि ते भर’ असे फोन सुरु झाले.

मात्र त्याने कर्जच घेतले नसल्यानं अशात आपण कर्ज भरणार नसल्याचं तो येणाऱ्या कॉल्सना सतत उत्तर देत असे. अशात, त्याचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हीडिओ त्याच्या कार्यालयातील सहकार्यांना पाठवण्यात आले. सोबतच घेतलेल्या कर्जाचे स्क्रिनशॉट्सही पाठवले. आणि याच सर्व बदनामीमुळे अस्वस्थ झालेल्या संदीपनं आपली जीवनयात्रा संपवली.

सध्या अशी अनेक प्रकरणं देशासोबत महाराष्ट्रात देखील उजेडात येतायत. मागील सहा महिन्यात तीन हजारांहून अधिक अशी प्रकरणं समोर आल्याचा अहवाल आहे. भारतातील अनेक राज्यात अशी प्रकरणं वाढू लागल्यानं अनेकांना मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय. प्लेस्टोर किंवा ॲप स्टोअरवर 140 ते 145 पर्यंत अशा ॲप्सची संख्या आहे. फक्त लोन किंवा कॅश असा जरी उल्लेख केला तर संपूर्ण यादीच समोर येते.

पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी बनावट बॅंक खाती आणि मोबाइल फोन वापरतात. पोलिस तपास करायला गेले की हे आरोपी जंगलाकडे पळ काढत असल्यानं देखील अडचणी निर्माण होतात. जंगलातून कार्यरत असल्यानं त्यांचा शोध घेणं कठिण होतं. पोलिस तपासात आरोपी हे राजस्थान आणि हरियाणातून कार्यरत असल्याचं देखील समोर आलंय. मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे ब्लॅकमेलिंग होत असल्याचं समोर आल्यानंतर गुगलनं देखील याची दखल घेतलीय. यापुढे अशा ॲप कंपन्यांना आरबीआयचा परवाना दाखवणे बंधनकारक केला आहे.

Team Global News Marathi: