तिन्ही पक्षांचे आमदार महाविकास आघाडीवर नाराज म्हणूनच….फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का देत माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी अखेर भाजपमध्ये घरवापसी केली आहे मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांचा पक्षप्रवेश पार पडला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनेक भाजप आमदार आपल्या संपर्कात असल्याचे दावे करत होते.मात्र येत्या काळात भाजपमध्ये आणखी काही जणांचे प्रवेश होणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गुगलीच टाकली आहे.स्वतःच्या पक्षात अस्वस्थता असून आमदार आमच्याकडे येणार अशा वावड्या उठवत असल्याचे म्हणत फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला हाणला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री जयकुमार रावल,आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय,आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.आगामी काळात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक मंडळी प्रवेश करणार आहेत.

सत्ताधारी पक्षांतील अस्वस्थता लक्षात आल्यानेच या पक्षांचे नेते भाजपा आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र भाजपातून एकही आमदार फुटणार नाही असे फडणवीस यावेळी म्हणाले.काही गैरसमजांमुळे बाळासाहेब सानप हे पक्षाबाहेर पडले होते.आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.सानप यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. सानप यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल.असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार आपल्या संपर्कात असल्याचे दावे,राष्ट्रवादीचे नेते करताना दिसत आहेत.पंरतु येत्या काळात भाजपमध्ये इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे महत्त्वाचे विधान केले. “येत्या काळात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे.

मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवतात की, भाजपचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. अशा वावड्या उठवण्याचे एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच हा आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, अशा प्रकारच्या पुंग्या सोडतात.

दुर्देवाने त्यांनी सोडलेल्या या पुंग्या माध्यमांमधीलही काहीजण वाजवतात. मात्र, चिंता करायची गरज नाही भाजपचे सर्व आमदार एकत्र आहेत. विशेष उल्लेख करून सांगतो की, विविध पक्षांमधून जे भाजपमध्ये आलेले आहेत, ते राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ आहेत. त्यांनी मोठे राजकारण बघितलेले आहे. त्यामुळे त्यांना हे समजते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या देशाचे भविष्य राहुल गांधी, युपीए नाही. तर देशाचे वर्तमान आणि भविष्य नरेंद्र मोदी आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणूक लढण्यावर देखील भाष्य केले. “आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असे ते सांगत आहेत. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर इच्छाच आहे. कारण, एकत्र लढल्याने एखादा तात्कालीक फायदा त्यांना होईल.

पण, ते तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते, त्या जागेत किती लोकं मावतील? हे देखील एक महत्वाचे असते. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणे कठीण जाते, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे, त्यातली सगळ्यात मोठी जागा जी आहे, ती भाजपसाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजप ती जागा व्यापल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून एखाद्या-दुसऱ्या निवडणुकीत इकडे तिकडे झाले तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही. या तीन पक्षाने आपल्याला संधी दिली आहे. आपल्या भरवशावर मोठे होण्याची ही संधी आपण लक्षात घेतली पाहिजे”, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकत्यांना केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: