आमदार राजेंद्र राऊत कोरोना पॉझिटिव्ह; तब्येत व्यवस्थित काळजीचे कारण नाही

बार्शी : बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांना शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती आमदार राऊत यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

‘‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही कारण नाही,’’ असे राऊत यांनी आपल्या फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

 

सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असताना अनेक जण, कार्यकर्ते, सामाजिक अंतराचे पालन करीत नाहीत. बार्शी शहर व तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार राऊत अनेक बैठकांसाठी जात होते. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असे त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खराडे यांनी स्पष्ट केले.

बार्शी शहर आणि तालुक्यातील माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करुन घ्यावी, सर्वांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे. माझी प्रकृती व्यवस्थित असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे, असे आमदार राऊत यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: