आमदार राजन साळवी यांची प्रमोद जठारांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार

 

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी प्रमोद जठार यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. प्रमोद जठारांनी छ.संभाजी महाराजांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल आमदार राजन साळवी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

१. तक्रारदार हे राजापूर मतदार संघातून निवडून आलेले आमदार आहेत. तक्रादार हे मराठा या जातीचे आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे तक्रारदार यांचे दैवत आहेत. लहानपणा पासूनच तक्रारदार व त्यांचे असंख्य अनुयायी हे छत्रपती संभाजी महाराज यांना दैवत मानतात. छत्रपती संभाजी महाराज हे तक्रारदार व त्यांचे सर्व अनुयायी व शिवसैनिक यांच्यासाठी अत्यंत पुज्यनिय असून ते त्यांच्यासाठी देवासमान आहेत. तक्रारदार व त्यांच्या गटाचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या छत्रपती संभाजी महाराजां विषयीच्या भावना अत्यंत पवित्र आहेत.

२. प्रमोद शांताराम जठार यांनी हेतुतः व जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांची तुलना नारायण तातू राणे यांच्या बरोबर केली आहे. नारायण तातू राणे हे अनेक फौजदारी केसमध्ये आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे अत्यंत निंदनिय कृत्य आहे. प्रमोद जठार यांनी दि. २४/०८/२०२१ रोजी “ छत्रपती संभाजी महाराजांना सुध्दा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले होते ” असे वक्तव्य केलेले आहे. असे वक्तव्य करण्यामागे नारायण राणे हे सुध्दा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना ही फौजदारी खटल्यातील आरोपी असलेल्या नारायण राणें बरोबर करुन प्रमोद शांताराम जठार यांनी तक्रारदार व तक्रारदार यांचे असंख्य अनुयायी व शिवसैनिक यांच्या भावना दुखावल्या आहेत.

३. श्री.जठार यांचे सदरहू वक्तव्य अनेक सोशल मिडीया, फेसबूक, व्हॉटस्अॅप, इलेक्टॉनिक मिडीयामध्ये प्रसिध्द झाले आहे. सबब तमाम जनतेमध्ये विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणा-या तक्रारदार यांच्या गटांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये असंतोष पसरला आहे. सदरचे जठार यांचे वक्तव्य हे चिथावणीखोर वक्तव्य असून सदरहू चिथावणीखोर वक्तव्यामुळे तक्रारदार व त्यांचे अनुयायी आणि नारायण राणे व जठार समर्थकांमध्ये व्देश, शत्रुत्व भावना पसरली असून परस्पर गटांमध्ये वाईट भावनांचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सदरहू जठार यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे संपुर्ण जिल्हयात वाईट परिणाम व पडसाद उमटले आहेत व दोन गटांमध्ये अत्यंत शत्रुत्व निर्माण होऊन त्याला हिंसक वळण लागणारे आहे.

४. त्यामुळे दि.२४/०८/२०२१ रोजी प्रमोद शांताराम जठार यांनी केलेले चिथावणीखोर कृत्य व वक्तव्य हे भारतीय दंड विधान संहिताचे कलम १५३ ब, १५३ ( १ ) ( क ), ५००, ५०५ ( २ ) प्रमाणे गुन्हयाचे कृत्य आहे. सबब श्री. प्रमोद शांताराम जठार यांचेवर प्रस्तुत कृत्याकरीता भारतीय दंड विधान संहितेचे वरील कलमांप्रमाणे कडक कारवाई होणे आवश्यक व गरजेचे आहे.

५. तरी तक्रारदारची विनंती की, आपण महोदयांनी प्रमोद शांताराम जठार यांचेवर वर नमुद चिथावणीखोर कृत्यांसाठी व वक्तव्यासाठी आणि त्यांच्या कृत्यांमुळे व वक्तव्यांमुळे समाजावर अत्यंत गंभीर परिणाम झाल्यामुळे त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
असा आशय असलेले निवेदन आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात सादर केले आहे.

Team Global News Marathi: