रझा आकादमीवर बंदी घाला आमदार भातखळकर यांची मागणी
फ्रान्सच्या नीस शहरात झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईत उमटले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात पायदळी तुडवण्यात आले. हे फोटो तुडवले जावेत म्हणून रझा अकादमीने रस्त्यावर चिटकवले होते. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ठाकरे सरकारवर टीका केली असून रझा अकादमीवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे.
भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. फ्रान्सच्या नीस शहरात कुराण हातात घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांनी तिघांची निर्घृण हत्या केली. काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र दाखवल्याने फ्रान्समध्ये शाळेच्या एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांबाबत कडक धोरण अवलंबवले आहे. रझा अकादमीने मुंबईच्या रस्त्यांवर त्यांचे चित्र चिटकवून तुडवले व त्यांचा निषेध केला.
रझा अकादमीच्या या निषेधाबाबत भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. ‘मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या राष्टध्यक्षांचे फोटो रस्त्यांवर चिटकवून भ्याड निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे कृत्य देशद्रोही स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे. सोबतच रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारने दाखवावी, असे आव्हान सरकारला दिले.