काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर उभे असलेले हिंदुत्व डळमळीत, मिळमिळीत आणि गर्भगळीत असणारच…
मुंबई : आमचे नेते देवेंद्र फडणवीस ‘घरबसे’ नसून लढवय्ये आहेत. कोरोनाची तमा न बाळगता अवघा महाराष्ट्र पिंजून काढत होते. लोकांचे अश्रू पुसत होते, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याना ट्विटद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी देवेंद्र फडणवीस लोकांच्या अडी-अडचणी सोडविण्यात मग्न होते. त्यांच्यामुळेच सरकारला चाचण्यांची संख्या वाढविणे भाग पडले. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ, परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची उडविलेली दाणादाण या साऱ्या संकटग्रस्त परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघेही विरोधी पक्षनेते संकटग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. घरात बसणे हा कोरोनापासून बचावाचा उपाय होता, पण त्या काळात घराबाहेर पडणे हा ‘लोकांना उपाय मिळवून देण्याचा मार्ग’ होता. असे घराबाहेर पडताना कधीना कधी आपणालाही कोरोनाची बाधा होईल याची शक्यता होतीच. म्हणून घाबरून दोघेही नेते घरी बसले नाहीत.
कोरोना काळात लोकांना उपचार मिळावेत आणि संकट काळात लोकांना मदत मिळावी यासाठी प्रशासन यंत्रणेला जाब विचारात होते आणि उपाय सुचवून मार्गही सांगत होते. उलट कोरोनाला घाबरून मुख्यमंत्री घरात बसून सामाजिक माध्यमातून लोकांशी संवाद साधत उपदेशाचे डोस पाजत होते. त्यामुळे त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत होती. मुख्यमंत्री आतातरी घराबाहेर पाडा, अन्यथा आम्हाला तोंड उघडावे लागेल, असा इशाराही देण्यात येत होता.
कोरोनाचा संसर्ग होताच फडणवीस यांनी ट्विटद्वारे जनतेला माहिती दिली आणि संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. संसर्गाची माहिती देताना फडणवीस म्हणाले आहेत की, आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. फडणवीस यांच्या संसर्गाबाबत एक वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना वारंवार काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. परिस्थिती किती गंभीर आहे, हे आज फडणवीसांना समजले असेल.
फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सूचना दिल्या असल्याची माहिती राऊत यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल, असेही राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार अतुल भातखळकर ट्विटरवर म्हणाले आहेत की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस ‘घरबसे’ नसून लढवय्ये आहेत. कोरोनाची तमा न बाळगता अवघा महाराष्ट्र पिंजून काढत होते. लोकांचे अश्रू पुसत होते. भाजपचे मुंबई मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही फडणवीस यांना एक कार्यक्रमात लढवय्ये नेते असे म्हटले आहे.