युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांची निवड

 

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची बुधवारी या पदावर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.  राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांचा कुणाल राऊत हा मुलगा आहे.

प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात कुणाल राऊत यांना  सर्वाधिक ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना ३ लाख ८० हजार ३६७ मते व शरण बसवराज पाटील यांना २ लाख ४६ हजार ६९५  मते मिळाली. कुणाल हे युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मोदी सरकारविरुद्ध जनतेत रान उठवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

घराणेशाहीची परंपराच प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पतंगराव कदम यांचे पुत्र डॉ. विश्वजित यांच्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे तर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल यांची निवड करण्यात आली आहे. युवक  काँग्रेसमध्ये जणू काही घराणेशाहीची प्रथा-परंपरा पडल्याचे चित्र आहे.

कुणाल राऊत अल्प परिचय

कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी  झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: