बीड – राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना काल सायंकाळी हृदयविकाराचा सौम्य धक्का आला आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, चिंतेचे कारण नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, ही माहिती कळताच अनेक नेत्यांनी ब्रीच कँन्डी रुग्णालयाकडे धाव घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सर्व तपासणी रिपोर्ट आले असून ते नॉर्मल आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून काळजीचे कारण नाही, असंही सांगितलं असल्याचं धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.
धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. डॉक्टर हे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी काही रिपोर्ट काढले असून, ते नॉर्मल आहेत अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, राजेश टोपे नंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीचकँडी रुग्णालयात जाऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली, प्रकृतीची चौकशी केली व लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून तब्येतीची माहिती घेतली.