मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून भर सभेत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा उल्लेख!

 

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. भर सभेत दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. त्यामुळे सभेत एकाच चर्चेला सुरवात झाली होती.

इंदापूर शहरात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष संजय सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. भाषणाची सुरुवात करताना राज्यमंत्री भरणे यांना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.

माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी तात्काळ दत्तामामांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर दत्तामामांनीही आपली चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मात्र, दत्तामामा यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानं उपस्थितांमध्ये काही काळ खळबळ आणि हशाही पिकला.

Team Global News Marathi: