मिंधे सरकार लवकर घालवलं नाहीतर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील

 

कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याचं वृत्त समोर येताच महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत असून यावर आता खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातलं ‘मिंधे सरकार’ लवकरात लवकर घालवलं पाहिजे, नाहीतर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

बेळगाव सीमाप्रश्नावरुन नुकतीच राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. असं असतानाही आता कर्नाटकच्या मंत्र्यांकडून जी भाषा बोलली जात आहे ती पाहता हे सरकार महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालं आहे असं दिसतं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर सीमाबांधवांच्या कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली आहे? आता तर सांगलीत जत तालुक्यावर कर्नाटकनं दावा केला आहे. कर्नाटकातही भाजपाचा मुख्यमंत्री आहे आणि इथं भाजपाचं मिंधे सरकार आहे. दोघांच्या संगनमतानं केंद्र सरकारला महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. कुणाला मुंबई तोडायची आहे तर कुणाकडून महाराष्ट्राला कुरतडण्याचं काम केलं जात आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

 

Team Global News Marathi: